अलिबाग | ‘शेअर बाजारात गुंतवणूक करा आणि अल्पावधीत मोठा नफा मिळवा’, असे आमिष दाखवत अलिबागमधील एका नागरिकाची तब्बल ६६ लाख ५४ हजार ३६३ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात सायबर भामट्यांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरु आहे.
सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिबागच्या शिवनगर-चेंढरे येथील फिर्यादी यांना फेसबुकच्या माध्यमातून एका अज्ञात व्यक्तीकडून लिंक पाठविण्यात आली होती. या लिंकच्या माध्यमातून आरोपींनी फिर्यादीशी संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळतो, असा विश्वास निर्माण केला. सुरुवातीला ऑनलाईन डेमो दाखवत गुंतवणुकीत मोठा परतावा मिळत असल्याचे भासविले.
आकर्षक नफ्याचे आकडे, बनावट व्यवहार आणि खोटे आर्थिक अहवाल दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले. फिर्यादी यांनी आरोपींच्या सांगण्यावरून विविध खात्यांमध्ये मोठ्या रकमा जमा केल्या. काही दिवसांनंतर गुंतवणुकीवरील नफा काढण्याचा प्रयत्न तांत्रिक कारणे, अतिरिक्त शुल्क आणि खाते पडताळणीच्या नावाखाली आणखी पैशांची मागणी करण्यात आली.
त्यानंतर संबंधित व्यक्तींशी संपर्क तुटल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. या प्रकारानंतर फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० (२००८ सुधारणेसह) कलम ६६ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१६ (२) आणि ३१८ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल जाधव करीत असून संबंधित बँक खाती, मोबाईल क्रमांक, आयपी अॅड्रेस आणि डिजिटल व्यवहारांची माहिती तपासली जात आहे.फसवणुकीतील रक्कम देशाबाहेरील खात्यांमध्ये वळविण्यात आली का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन दरम्यान, वाढत्या ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावरून येणार्या अनोळखी लिंक, जलद नफ्याची हमी देणार्या योजना आणि अनधिकृत ट्रेडिंग अॅप्सपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीची अधिकृत नोंदणी, सेबी मान्यता आणि व्यवहारांची सत्यता तपासावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.