पत्नीला जिवंत जाळणार्‍या पतीला जन्मठेप , माणगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय

By Raigad Times    21-May-2026
Total Views |
alibag
 
अलिबाग | पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत पेटवून खून केल्याप्रकरणी पतीला माणगावच्या अतिरिक्त सत्र
न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली दिपक अशोक झांजे (वय ३६) असे दोषी ठरलेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला चार हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास चार महिने सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे.
 
ही धक्कादायक घटना ३१ डिसेंबर २०२१ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास महाड तालुक्यातील ढालकाठी येथील आरोपीच्या राहत्या घरी घडली होती. कौटुंबिक झालेल्या वादानंतर दिपक झांजे याने पत्नी निशा झांजे (वय २८) यांच्या अंगावर प्लास्टिकच्या बाटलीतून पेट्रोल ओतले आणि माचिसच्या सहाय्याने त्यांना पेटवून दिले. गंभीर भाजलेल्या निशा यांना उपचारासाठी मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
सुरुवातीला याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ३२३ आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल आला होता. मात्र, उपचारादरम्यान ६ जानेवारी २०२२ रोजी निशा झांजे यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यात भादंवि कलम ३०२ ची भर घातली. दरम्यान, उपचार सुरू असताना पोलिसांनी निशा झांजे यांचा मृत्युपूर्व जबाब नोंदवला होता. या जबाबात त्यांनी पतीनेच कौटुंबिक वादातून पेट्रोल ओतून आग लावल्याचे स्पष्ट नमूद केले होते.
 
या मृत्युपूर्व न्यायालयात महत्त्वपूर्ण पुरावा मानण्यात आले. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आर. खाडे यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. माणगाव-रायगड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे यांनी प्रभावी बाजू मांडत एकूण १५ साक्षीदार यामध्ये वैद्यकीय अधिकारी, मृत्युपूर्व जबाब नोंदविणारे कार्यकारी दंडाधिकारी, घटनास्थळी राहणारे शेजारी व घरमालक यांचा समावेश होता. तसेच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील मृत्युपूर्व जबाबासंदर्भातील महत्त्वपूर्ण न्यायनिर्णयही न्यायालयासमोर सादर करण्यात आले.