उरण | उरण नगरपालिकेच्या हद्दीतील बौद्धवाडा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या समाज मंदिराची सिलिंग अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, समाज मंदिराचे बांधकाम सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. काम सुरू असतानाच नागरिकांनी याबाबत नगरपालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकामादरम्यान स्लॅबचे काम रात्री करण्यात आले होते. तसेच आवश्यक तांत्रिक निकषांचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कॉलममधून पाईपलाईन टाकणे आणि स्लॅबखाली योग्य प्रकारे प्लास्टर न करणे यासारख्या गंभीर त्रुटी कामात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर उरण शहरातील शासकीय इमारतींच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या काही वर्षांत उभारण्यात आलेल्या काही बांधकामांमध्ये दर्जा आणि अनियमितता असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली आहे. दरम्यान, या समाज मंदिराचे बांधकाम संबंधित ठेकेदारामार्फत करण्यात आले होते. अवघ्या दोन वर्षांतच सिलिंग कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार, अभियंते आणि जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात उरण नगरपालिकेच्या अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.