अलिबाग | ऑनलाईन औषध विक्री (ई-फार्मसी) आणि इंस्टंट डिलिव्हरी अॅप्सच्या विरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्सने पुकारलेल्या देशव्यापी संपाला रायगड जिल्ह्यात टक्के प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील सर्व लहान- मोठ्या गावांमधील औषध दुकाने पूर्णपणे बंद होती.
संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून औषध विक्रेत्यांनी आपत्कालीन औषध वितरणाची पर्यायी व्यवस्था केली होती. या देशव्यापी आंदोलनात रायगड जिल्ह्यातील सुमारे दोन हजार औषध विक्रेते सहभागी झाले होते. या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक औषध दिवसभर बंद होती.
मात्र रुग्णांच्या आरोग्याची गरज लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली होती. ज्या रुग्णाची आज ऑपरेशन होती त्यांना काही औषध पुरवठा केला असल्याचे रायगड जिल्हा केमिस्ट अँड डिस्ट्रिब्युटर असोसिएशनचे अध्यक्ष लीलाधर पाटील यांनी सांगितले. औषध विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, ऑनलाईन औषध विक्रीमुळे औषध क्षेत्रातील अनेक नियमांचे उल्लंघन होत काही ठिकाणी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
विशेषतः अँटीबायोटिक्सचा चुकीचा वापर वाढण्याबरोबरच बनावट औषधांचा धोका वाढल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. याशिवाय रुग्ण आणि फार्मासिस्ट यांच्यातील प्रत्यक्ष संवाद कमी होत असल्याने औषधांच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन मिळत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.