खोपोली | खोपोली नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी (१३ मे) शहरातील विविध विकासकामांच्या अजेंड्यावर पार पडली. मात्र या सभेत केवळ विकासकामांवर चर्चा न होता, प्रशासकीय कामकाजात काही कार्यकर्ते आणि नगरसेविकांच्या पतींकडून होत असलेल्या हस्तक्षेपाचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करण्यात आला.
या मुद्द्यावर सत्ताधारी गटातील नगरसेवक राहुल गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे आणि प्रशासनाला थेट जाब विचारला. शहरात सत्ताबदल झाल्यानंतर सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने विविध प्रभागांत विकासकामे सुरु आहेत. मात्र काही नगरसेविकांचे पती स्वतःच नगरसेवक असल्याप्रमाणे सोशल मीडियावर तसेच प्रत्यक्ष क्षेत्रात सक्रियपणे वावरत असल्याची चर्चा नगरपरिषद व शहरात सुरु आहे.
त्यामुळे विकासकामांच्या श्रेयवादाला खतपाणी मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गायकवाड यांनी सर्वसाधारण सभेत स्पष्ट शब्दांत प्रश्न उपस्थित केला की, "प्रशासनाने नेमके कोणाचे ऐकायचे? जनतेतून निवडून आलेल्या नगरसेवकांचे की सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या इतर व्यक्तींचे?” या प्रश्नामुळे सभागृहात चांगलीच चर्चा रंगली आणि नगराध्यक्षांना सत्ताधारी गटातूनच घरचा आहेर मिळाल्याची चर्चा सुरु झाली.
यावर नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना देत सांगितले की, "नगराध्यक्ष आणि प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांचेच म्हणणे ग्राह्य धरावे.” तसेच प्रशासकीय कामकाजात शिस्त राखण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान, सभेत घंटागाडी सेवा वेळेवर पोहोचत नसल्याबाबतही मुद्दा उपस्थित झाला. नगरसेवक सुनील पाटील यांच्यासह इतर नगरसेवकांनी या सेवेत होणार्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली.
एकूणच, खोपोली शहरातील विकासकामांसोबतच श्रेयवाद, प्रशासकीय हस्तक्षेप आणि कार्यकर्त्यांच्या अतिरेकी सहभागाचे प्रश्न आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे पुढील काळात नगराध्यक्ष आणि प्रशासन निवडून आलेले प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि संबंधित घटक यांच्यात समन्वय कसा साधतात?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.