इंधन बचत ! रायगडच्या एसपी आंचल दलाल सायकलवरुन कार्यालयात

By Raigad Times    15-May-2026
Total Views |
 alibag
 
अलिबाग | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्वतः सायकलवरुन कार्यालयात येत इंधन बचतीचा संदेश दिला. बुधवारी (१४ मे) सकाळी आंचल दलाल या शासकीय वाहनाऐवजी सायकलवरुन कार्यालयात दाखल झाल्या.
 
यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्यांचे स्वागत करत या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी त्यांनी सायकलचा वापर सुरु केला आहे. "चांगल्या उपक्रमाची सुरुवात स्वतःपासून करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी नमूद केले. वाढत्या वाहनांमुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि इंधनाचा अतिरिक्त वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.
 
छोट्या अंतरासाठी सायकल किंवा पायी चालण्याचा पर्याय स्वीकारल्यास इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणास मदत होऊ शकते, तसेच आरोग्यही सुधारते, असेही त्या म्हणाल्या. या उपक्रमामुळे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रेरित झाले असून भविष्यात आठवड्यातील ठराविक दिवशी ‘सायकल डे’ साजरा करण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. काही कर्मचार्‍यांनीही सायकलचा वापर वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या उपक्रमाचे कौतुक होत असून वरिष्ठ अधिकारी स्वतः पुढाकार घेत असल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश जात आहे.