रोहा | रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील डंम्पिंग ग्राऊंड परिसरात काम करत असताना विजेचा तीव्र धक्का लागून एका कर्मचार्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
अशोक कुशा वाघमारे (वय ४२, रा. चणेरा) असे मृत कर्मचार्याचे नाव आहे. याबाबत अशोक वाघमारे यांची पत्नी रंजना वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अशोक वाघमारे हे नेहमीप्रमाणे डंम्पिंग ग्राऊंड परिसरात साफसफाई तसेच मशीनमध्ये कचरा जाळण्याचे काम करत होते. यावेळी मशीनमधील विद्युत प्रवाहाचा त्यांना जोरदार धक्का बसला. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस अधीक्षक सुयशकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार स्वप्नील म्हात्रे आणि सुनील सपकाळ पुढील तपास करत आहेत. दरम्यान, डंम्पिंग ग्राऊंड परिसरात सुरक्षेच्या प्रभावी उपाययोजना नसल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याची चर्चा सुरु असून प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेमुळे कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.