माणगाव | एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित क्षमतावाढी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभाग आणि एनटीपीसी यांच्यात सुधारित सामंजस्य करार करण्यात आला. या दोन्ही प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये १८०० मेगावॅटवरुन २६०० मेगावॅट इतकी वाढ होणार आहे.
या सामंजस्य करारामुळे माणगाव तालुक्यातील कुंभे जलविद्युत प्रकल्पाचे अपूर्ण अवस्थेत असलेले काम विद्युत वेगाने सुरू होणार आहे. त्यामुळे माणगाव तालुक्यातील निजामपूर आणि महाड येथील रायगड किल्ल्याजवळील बहुतांश परीसर हिरवागार होऊन पाणी टंचाईतून मुक्त होण्यासाठी मदत होईल.
तसेच शेतकर्यांच्या हाताला रोजगार निर्माण होणार आहे. हा प्रकल्प गेली ४० वर्षे रखडलेल्या अवस्थेत होता. आता या प्रकल्पाला नवसंजीवनी मिळाली असल्याने हा परीसर सुजलाम सुफलाम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच अंबा जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याने तेथील शेतकर्यांना लाभ मिळणार आहे. मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण विकास पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांच्यासह विविधी विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर व एनटीपीसीचे विभागीय कार्यकारी संचालक ई. सत्या फानी कुमार यांनी सामंजस्य कराराची माहिती दिली. सार्वजनिक खाजगी भागीदारीव्दारे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसन करण्याचे धोरण २० डिसेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आले आहे. आतापर्यंत ५९ सामंजस्य करार झाले आहेत. एनटीपीसी बरोबरचा हा राज्याचा एकूण ६० वा सामंजस्य करार आहे. या धोरणास अनुसरून ६० सामंजस्य करारांद्वारे ८२ हजार १५ मे.वॅ. वीज निर्मिती क्षमता अपेक्षित असून याव्दारे रु. ४.२८ लक्ष कोटी इतकी गुंतवणूक तर १.३१ लक्ष मनुष्यबळ रोजगार निर्मिती होणार आहे.
एनटीपीसीचा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठीचा सुधारित सामंजस्य करार
एनटीपीसी लिमिटेड यांनी रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे या उदंचन जलविद्युत प्रकल्पांचे सविस्तर सर्वेक्षण केल्यानंतर प्रकल्पांच्या स्थापित क्षमतेमध्ये ८०० मे.वॅ. ने वाढ होत असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने मूळ सामंजस्य करारात सुधारणा करण्याची सूचना केली आहे. याअनुषंगाने एनटीपीसी लिमिटेड यांनी केलेली विनंती विचारात घेता मूळ सामंजस्य करारातील उदंचन योजनांसाठी सुधारीत सामंजस्य करण्यात आला.