माणगाव । माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील एका लॉजमध्ये तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे. सोमवारी (20 एप्रिल) लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजमधील कर्मचार्यांना एका खोलीत संशयास्पद हालचाल जाणवली.
वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता, आतमध्ये तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. तिच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून हल्ल्याचे स्वरुप पाहता हा प्रकार अत्यंत क्रूरपणे केल्याचे स्पष्ट होते. घटनेची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. गोरेगाव पोलीस ठाण्याचे पथक तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात संशयित तरुण हा रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याचे चर्चा असून, हत्येनंतर तो फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.
या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रेमसंबंध, वैयक्तिक वाद किंवा इतर कारणांचा तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तसेच साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.