माणगाव-इंदापूर बायपास रखडला , कोकण रेल्वेचा आडमुठेपणा!

नितीन गडकरींचा शब्द पुन्हा वाया जाणार?

By Raigad Times    20-Apr-2026
Total Views |
alibag
 
अलिबाग । मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील माणगाव आणि इंदापूर बायपासचे काम कोकण रेल्वेमुळे रखडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे 31 मेपर्यंत महामार्गाचे उर्वरित काम पूर्ण होईल का, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांना दिलेला शब्द पुन्हा एकदा वाया जाण्याची चिन्हे आहेत.
 
या पार्श्वभूमीवर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन रखडलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. कोकण रेल्वे मार्गावर ओव्हरब्रिज उभारणीदरम्यान सिग्नल आणि इलेक्ट्रिफिकेशनसाठी असलेले विद्युत खांब हे मुख्य अडथळे ठरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. माणगाव आणि इंदापूर येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत.
 
याशिवाय नागोठणे आणि कोलाड परिसरातील पूल बांधकामेही संथ गतीने सुरू आहेत. परिणामी, वाहतूक कोंडी वाढत असून प्रवासी, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान, 2011 साली सुरू झालेल्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे काम आणि 2014 पासून सुरू असलेल्या इंदापूर ते झाराप या टप्प्याचे चौपदरीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही.
 
जवळपास 14 वर्षे उलटूनही प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने कोकणवासीयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. खासदार सुनील तटकरे यांनी संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांची तातडीने बैठक बोलावून अडचणी दूर करण्याची मागणी केली आहे. यावर नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत समन्वय साधून समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात कामाची सध्याची गती आणि अपूर्ण प्रकल्पांची स्थिती लक्षात घेता नितीन गडकरी यांनी दिलेली 31 मेची डेडलाईन पूर्ण होणे अवघड असल्याचे चित्र आहे.
 
माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम मागील काही वर्षांपासून रखडले आहे. या कामासाठी आतापर्यंत तीन ठेकेदार बदलण्यात आले. त्यानंतर आता कुठे हे काम युद्ध पातळीवर सुरू झाले. कामाचा वेग पाहता जून पर्यंत हे दोन्ही बायपास वाहतुकीसाठी खुले होतील अशी अपेक्षा होती. परंतु कोकण रेल्वेच्या विद्युत खांबांमुळे रेल्वेमार्गावरील उड्डाण पुलाच्या कामात अडथळा येत आहे.
 
हे विद्युत खांब हलवावे यासाठी महामार्ग प्राधिकरणाने सातत्याने कोकण रेल्वेकडे पाठपुरावा केला. खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत विद्युत खांब हटवण्याचे कोकण रेल्वेच्या अधिकार्‍यांनी मान्य केले परंतु या कामात चालढकल होत असल्याने बायपासचे काम रखडले आहे.