अलिबाग । दहा वर्षे प्रेमसंबंधात राहिलेल्या प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने अलिबाग येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अक्षय निकाळे असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा नाशिक येथील रहिवासी होता. अक्षयने आत्महत्येपूर्वी प्रेयसीचे फोटोही आजूबाजूला ठेवले होते.
अक्षय युवराज निकाळे (वय 30 ,रा. रामनाथ, अलिबाग,मूळ नाशिक) याचे शहरातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. साधारण दहा वर्षे चाललेले हे प्रेमसंबंध लग्नाच्या टप्प्यावर येत असतानाच प्रेयसीने लग्नास नकार दिला. त्यामुळे अक्षय नैराश्यात गेला होता. यातूनच त्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
प्रसाद गुरव यांनी याची माहिती अलिबाग पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. यानंतर अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे करत आहेत.