संपलेला पक्ष म्हणून हिणवले...तोच पक्ष तिन्ही ठिकाणी सत्तेत!

शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी टिकाकारांना सुनावले

By Raigad Times    18-Apr-2026
Total Views |
karjat
 
कर्जत | "शिवसेना (ठाकरे गट) पक्ष आज जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कर्जत नगरपरिषद या तिन्ही स्तरांवर सत्तेत आहे. हा आमचा निर्णय योग्य असल्याचे शिवसैनिकांनी सिद्ध करुन दाखवले आहे” अशा शब्दांत कर्जत तालुक्यात संपलेला पक्ष म्हणून टीका करणार्‍यांना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी चांगलेच सुनावले आहे.
 
कर्जत तालुका शिवसेनेची (ठाकरे गट) आढावा बैठक तालुका प्रमुख बाजीराव दळवी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीवर निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषद गटनेते बाबू घारे, सदस्या सुनीता मोरे, पंचायत समिती सदस्य कविता शिंगवा, सुषमा पवाळी, नमिता श्रीखंडे, माथेरान नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन दाभेकर, नगरसेवक प्रशांत पाटील, नगरसेविका सुचेता खोत, मानसी कानिटकर याचा समावेश होता.
 
यावेळी नितीन सावंत यांनी सांगितले की, नगरपरिषद व जिल्हा परिषद स्तरावर परिवर्तन आघाडी स्थापन करण्याच्या निर्णयावर टीका झाली होती. मात्र, कार्यकर्त्यांना संधी मिळावी व पक्ष बळकट व्हावा यासाठी हा निर्णय घेतला होता. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत असून पक्ष सत्तेत अग्रस्थानी पोहोचला आहे.बाबू घारे यांनी संघटना मजबूत करण्यावर भर देत,"दर तीन महिन्यांनी बैठक घेऊन गटविकास अधिकार्‍यांच्या माध्यमातून विकासकामांचा आढावा घेण्यात येईल.
 
उपलब्ध निधीचा वापर गटाबाहेरील भागांसाठीही केला जाईल,” असे सांगितले. तसेच, ग्रामपंचायत निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे आणि "बीडपासून खांडसपर्यंत भगवा फडकला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात विभागप्रमुख संदीप रुठे, विभाग संघटक रमेश भुसाळ, माजी सरपंच प्रमिला बोराडे, युवा कार्यकर्ते कुमार बासरे, शाखाप्रमुख संजय तरे, वैभव पेठे, जगदीश ठाकरे आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी तालुका संघटक माधव कोळंबे, ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन ओसवाल, कर्जत पंचायत समिती उपसभापती चित्रा ठाकरे, उपनगराध्यक्ष संतोष पाटील, महिला आघाडी तालुका संघटक करुणा बडेकर, उपतालुका प्रमुख दशरथ भगत, माथेरान शहर प्रमुख कुलदीप जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.