जेएसडब्ल्यूसाठी महापारेषणाच्या पायघड्या ! योग्य मोबदल्याशिवाय काम करू देणार नाही

शेतकऱ्यांचा प्रचंड संताप

By Raigad Times    17-Apr-2026
Total Views |
alibag 
अलिबाग : स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीतून जाणाऱ्या 220 के.व्ही. नागोठणे–एसपीसीएल विद्युत वाहिनीचे कंडक्टर बदलण्याचे काम तसेच जेएसडब्ल्यू कंपनीला 400 के.व्ही. विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिनीमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी अक्षरशः झगडावे लागत आहे.
 
अतिउच्चदाब प्रकल्प कळवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या भूमिकेमुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाल्याचे चित्र आहे. महापारेषण कंपनीसाठी पायघड्या घालत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.या वाहिनीच्या कामामुळे बाधित होणाऱ्या जमिनींच्या नुकसान भरपाईच्या प्रश्नावर गुरुवारी (16 एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी बाधित शेतकरी, जेएसडब्ल्यू, बीएनजी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपले अडचणी मांडत मनोऱ्याखालील व वाहिनीखालील जमिनींसाठी योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
 

स्थानिक शेतकऱ्यांच्या हक्कांबाबत कंपनीकडून घेतले जाणारे धोरण संतापजनक असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कामे सुरू केल्यामुळे परिसरात असंतोष वाढत असून प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सकारात्मक भूमिका घेतली; मात्र कंपनी आणि महापारेषणच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर शेतकरी खूश दिसले नाहीत. त्यामुळे योग्य मोबदला, पारदर्शक प्रक्रिया आणि आवश्यक सुविधा दिल्या तरच शेतकरी सहकार्य करतील, असा स्पष्ट संदेश बैठकीत देण्यात आला.

दरम्यान, “शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या जमिनीवर टॉवर आणि विद्युत वाहिन्या उभारल्या जात आहेत. योग्य मोबदला आणि पायाभूत सुविधा दिल्याशिवाय भूसंपादनास तयार होणार नाही,” असा इशारा शेकाप नेते ॲड. मानसिंह म्हात्रे यांनी दिला.