शिवराज्याभिषेक सोहळ्यात रायगडावर , तलवारी नाचविण्यास बंदी

किल्ल्यावर सिलेंडर नेता येणार नाही-जिल्हाधिकारी

By Raigad Times    15-Apr-2026
Total Views |
ALIBAG
 
अलिबाग | किल्ले रायगड येथे साजरा होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्यात रात्रीच्या वेळी नाग्या तलवारी नाचवण्यावर बंदी घालण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. तसेच गडावर सिलेंडर नेण्यासही निर्बंध घालण्यात येणार आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्यास येणार्‍या शिवप्रेमींच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
शिवराज्याभिषेक सोहळ्याची पूर्वतयारी करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आँचल दलाल, शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या संयोजिका संयोगिताराजे भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी किल्ल्यावरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याची गंभीर बाब समोर आली.
 
गडावरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असणे ही चिंताजनक बाब असून पुरातत्त्व विभाग आणि रायगड प्राधिकरण यांनी तातडीने सर्व सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. यासोबतच गडावरील सुरक्षा आणि स्वच्छतेचा मुद्दा प्रकर्षाने उपस्थित करण्यात आला. सोहळ्याच्या दिवशी गडावर सिलेंडर नेले जात असल्याने, गडावर अग्निशमन यंत्रणा नसताना असे सिलेंडर नेणे धोकादायक असल्याचे शिवप्रेमींनी निदर्शनास आणून दिले.
 
ALIBAG
 
यावर किल्ल्यावर सिलेंडर नेण्यास निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तयार केलेले अन्न वर नेऊन विक्री करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. तसेच किल्ल्यावर रात्री मोठ्या आवाजात ढोल वाजवून नाग्या तलवारी नाचवल्या जात असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.
 
उत्सव समितीच्या संयोगिताराजे भोसले यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी रात्री नाग्या तलवारी नाचवण्यास बंदी घालण्याच्या सूचना दिल्या. मात्र पारंपरिक मर्दानी खेळांना मुभा देण्यात येणार आहे. दरम्यान, प्रवेश तिकीटातून सुमारे ८० लाख रुपये पुरातत्त्व विभागाकडे जमा झाल्याचे सांगण्यात आले. त्या तुलनेत गडावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी संयोगिताराजे भोसले यांनी केली.
 
लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्था यावर विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागणी संयोगिताराजे भोसले यांनी केली. लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्था यावर विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.