खालापूर | दुप्पट-तिप्पट परताव्याचे तसेच आकर्षक बक्षिसांचे आमिष दाखवून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खालापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. या प्रकरणामुळे चौक व खालापूर परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पुष्टी मिळाली आहे.
खालापूर तालुक्यात २०२३ पासून "सावी कंन्सल्टन” कंपनी चौक परिसरात कार्यरत होती. जानेवारी २०२५ मध्ये खालापूर येथे भाडेतत्त्वावर आलिशान कार्यालय सुरू करण्यात आले. व्यावसायिक, नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिकांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात येत होते. सुरुवातीला दाम दुप्पट परतावा आणि भेटवस्तू देऊन विश्वास संपादन करण्यात आला, मात्र नंतर परतावा थांबणे आणि कार्यालय बंद दिसू लागल्याने गुंतवणूकदारांमध्ये संशय निर्माण झाला.
या योजनेत सुमारे दीड हजारांहून अधिक गुंतवणूकदार अडकले असून अंदाजे ५० ते ६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याच अंदाज व्यक्त होत आहे. स्थानिक एजंटांच्या माध्यमातून नागरिकांना गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले आहे. गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कंपनीच्या व्यवस्थापक श्वेता प्रभू सह पंकज शहा, देवेंद्र सरदार या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सह. निरीक्षक मनीष मोरे करीत आहेत.