मुंबई | राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगाने मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्ययावत ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू करण्यात येणार असून, या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया अवघ्या ८ तासांत पूर्ण होणार आहे.
या नव्या प्रणालीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे आता रुग्णाला स्वतः अर्ज भरावा लागणार नाही. कक्षाशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमार्फतच थेट अर्ज सादर करण्यात येणार आहे. रुग्णाने आवश्यक कागदपत्रे रुग्णालयात सादर केल्यानंतर, रुग्णालय प्रशासन तो अर्ज मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवेल. सर्व कागदपत्रे नियमानुसार योग्य असल्यास, कार्यालयीन स्तरावर ८ तासांत अर्ज मंजूर केला जाणार आहे.
त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार असून उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात (१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६) राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
यामुळे मंजुरी प्रक्रिया जलद होऊन रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवीन प्रणालीचे लवकरच अधिकृत उद्घाटन करण्यात येणार असून, त्यानंतर ती राज्यभर प्रभावीपणे राबवण्यात येईल. अधिक माहितीसाठी गरजू रुग्णांनी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.