मुंबई | कोकणातील आंबा बागायतदारांना जाहीर केलेल्या तुटपुंज्या मदतीचा निर्णय मागे घ्या. कोकणातील शेतकर्याच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊन भरीव मदत करा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे. यावेळी पाच टक्केही आंबा शेतकर्याच्या हातात शिल्लक नाही.
कोकणातल्या माणसाची उपजीविका हापूस आंब्यावर चालते. कधी नव्हे त्या मदतीचा हातभार लावला नाही तर शेतकरी आत्महत्या करेल असे कदम म्हणाले. २० आणि २५ हजारात काही होत नाही. कोकणातील शेतकर्याला भरीव मदत करावी अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. कोकणातला शेतकरी कधी आत्महत्या करत नाही, कधी कर्जमाफी मागत नाही. कोकणातला शेतकरी स्वाभिमानी आहे.
त्यामुळं यावेळी कोकणातला शेतकरी जगेल अशी मदत करावी अशी मागणी कदम यांनी केली आहे. राज्य सरकारने आंबा व काजू उत्पादक शेतकर्यांसाठी जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची आर्थिक मदत तुटपुंजी असल्याची टीका देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली होती. एका बाजूला औषध फवारणी, खते, मजुरी आणि वाहतुकीचा खर्च लाखांच्या घरात गेला असताना, सरकार केवळ २२ हजार रुपये देऊन शेतकर्यांचे समाधान करु पाहत आहे.
एका आंबा बागेचा वार्षिक खर्च आणि झालेली हानी पाहता, ही रक्कम फवारणीच्या एका हप्त्यासाठीही पुरेशी नाही. वारंवार होणार्या नुकसानामुळे कोकणचा शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. अशा परिस्थितीत सरकारने जाहीर केलेली ही मदत शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली आहे. आंबा व काजू पीकविमा कंपन्याकडून शेतकर्यांना लुबाडले जात आहे. कर्जमाफीमध्येही निकष व अटी घालून शेतकर्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले जात असल्याची टीका राजू शेट्टींनी देखील केली होती. राजकारणापलीकडे कोकणातील लोकप्रतिनिधींनी आंबा व काजू बागायतदार यांच्या प्रश्नावर मौन पाळले आहे. आंबा व काजू पीकविमा कंपन्याकडून शेतकर्यांना लुबाडले जात असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.