रेवदंडा | रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांवर येणार्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आता अत्याधुनिक ‘रोबोटिक वॉटर क्राफ्ट’ तैनात करण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत समुद्रात बुडणार्या पर्यटकांना वाचवण्यासाठी या यंत्रणांचा वापर ‘जीवरक्षक प्रणाली’ म्हणून केला जाणार आहे. नागाव किनार्यावर हा प्रयोग सर्वप्रथम करण्यात आला आहे.
समुद्रकिनार्यांवरील वाढती पर्यटक संख्या आणि त्यातून उद्भवणार्या अपघातांच्या घटनांचा विचार करून प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण प्रयोग हाती घेतला आहे. यासाठीची एक कार्यशाळा व प्रशिक्षण शिबीर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केला होता. या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचा सहभाग होता. तसेच नागाव, काशीद आणि श्रीवर्धन येथील ग्रामपंचायतींनाही निमंत्रण देण्यात आले होते.
मात्र नागाव ग्रामपंचायत सरपंच हर्षदा मयेकर वगळता इतर सरपंच अनुपस्थित राहीले. त्यामुळे हा अभिनव प्रयोग राबवण्याचा मान नागावला मिळाला आहे. पूर्णतः स्वयंचलित रोबोटिक यंत्रणा रिमोट कंट्रोलद्वारे कार्यरत असून पाण्यात अडकलेल्या व्यक्तीपर्यंत वेगाने पोहोचून त्यांना सुरक्षित किनार्यावर आणण्यास सक्षम आहे. ही प्रणाली तसेच नौदलाच्या मानकांनुसार प्रमाणित असून सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सुरक्षित तसेच पर्यटकांना अधिक विश्वासार्ह व सुरक्षित अनुभव मिळणार आहे.