घरफोडी करणारे 3 सराईत अटकेत , 60 लाखांचा मुद्देमाल नेला होता चोरुन

पनवेल शहर पोलिसांची कारवाइ

By Raigad Times    11-Apr-2026
Total Views |
panvel 
 
पनवेल । पनवेल शहरातील तक्का तसेच करंजाडे परिसरात घरफोडी करणार्‍या तिघा सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा मोठा मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत केली आहे. या कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या घटनांचा छडा लागल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, तक्का परिसरात आरोपी ललित शाही (वय 33), किशोर शाही (वय 29) व शेरबहादूर शाही (वय 35) यांनी संगनमत करून घरफोडीची मालिका राबवत सोन्याचे दागिने, रोख रक्कम व घड्याळ असा सुमारे 60 लाख 88 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. तसेच करंजाडे परिसरातही अशाच प्रकारे घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची नोंद आहे.
 
या घटनांबाबत तक्रार प्राप्त होताच पनवेल शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोलीस हवालदार परेश म्हात्रे, गंथडे, वायकर, दिवेकर, पोलीस नाईक सम्राट डाकी व विनोद देशमुख यांच्या पथकाने या चोरांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान पोलिसांनी तिघांकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस दलाचे कौतुक करण्यात येत आहे.