स्टील मार्केट बनले चोरट्यांचे अड्डे! व्यापार्‍यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; चोरी-लूटमार थांबणार कधी?

By Raigad Times    11-Apr-2026
Total Views |
 panvel
 
पनवेल । कळंबोली येथील आशिया खंडातील सर्वात मोठ्या लोह-पोलाद मार्केटमध्ये सध्या गुन्हेगारीचे सावट गडद होत चालले असून, या महत्त्वाच्या व्यापारी केंद्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
 
देशाच्या कानाकोपर्‍यातून दररोज हजारो टन लोखंड-पोलादाची आवक- जावक करणार्‍या या बाजारपेठेत व्यापारी, वाहतूकदार, माथाडी कामगार आणि वाहन चालक यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, याच गर्दीचा आणि रात्रीच्या वेळेतील कमी सुरक्षेचा फायदा घेत चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडल्याचे चित्र समोर येत आहे. यासंदर्भात शिवसेनेचे शहर प्रमुख तुकाराम सरक यांनी आवाज उठवला आहे.
 
स्टील मार्केटमध्ये पोलिसांची गस्त वाढावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या मार्केटचे आर्थिक आणि व्यापारी महत्त्व अत्यंत मोठे असून, राज्याच्या अर्थचक्रातही या बाजारपेठेचा मोठा वाटा आहे. रेल्वेमार्गे तसेच रस्तेमार्गे होणारी मालवाहतूक, मोठ्या प्रमाणात चालणारे व्यवहार, हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह या सगळ्यामुळे कळंबोली स्टील मार्केट हे एक जिवंत आर्थिक केंद्र मानले जाते. परंतु, वाढत्या गुन्हेगारीमुळे या केंद्रावर असुरक्षिततेची काळी छाया पडू लागली आहे.
 
विशेषतः रात्रीच्या वेळी परिस्थिती अत्यंत गंभीर बनत असून, मोटरसायकलवरून फिरणार्‍या चोरट्यांच्या टोळ्या अचानक हल्ले करून नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. व्यापारी, ट्रान्सपोर्टर आणि माथाडी कामगारांना लक्ष्य करून लूटमार केली जात आहे. काही प्रकरणांमध्ये चोरट्यांकडून धाकदपटशाही करून रोख रक्कम व मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या जात असल्याचेही समोर आले आहे. याशिवाय, मार्केट परिसरात उभ्या असलेल्या मालवाहू वाहनांमधून बॅटर्‍या चोरीला जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
 
अनेक वाहन चालकांना सकाळी वाहन सुरू करताना बॅटरीच गायब असल्याचे लक्षात येत असून, यामुळे त्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्याचप्रमाणे वाहनांमधील डिझेल चोरी करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. काही ठिकाणी डिझेल काढण्यासाठी वाहनांच्या टाक्यांमध्ये छेडछाड केल्याच्या घटनाही समोर येत आहेत. स्थानिक व्यापार्‍यांच्या मते, रात्रीच्या वेळेत पोलीस गस्त अत्यंत अपुरी पडत असून, काही भागांमध्ये अंधाराचे प्रमाण जास्त आहे. सीसीटीव्ही यंत्रणा अपुरी किंवा निकामी असल्यामुळे गुन्हेगारांची ओळख पटविणे कठीण होत आहे.
 
परिणामी, गुन्हेगारांना कोणतीही भीती न राहता ते सर्रास गुन्हे करत असल्याचे दिसून येत आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे व्यापारी, कामगार आणि वाहन चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकांनी या परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त करत तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या वतीने कळंबोली पोलीस ठाण्याकडे सविस्तर निवेदन देण्यात आले असून, लोह-पोलाद मार्केट परिसरात 24 तास पोलीस बंदोबस्त ठेवण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.
 
तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमावे, बीट मार्शलच्या फेर्‍या वाढवाव्यात, तसेच संशयित वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी नियमित नाकाबंदी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करणे, अंधाराच्या ठिकाणी प्रकाशयोजना सुधारणे आणि व्यापारी व कामगार संघटनांशी समन्वय साधून संयुक्त सुरक्षा यंत्रणा उभी करणे, यावरही भर देण्यात आला आहे.
 
कळंबोलीसारख्या महत्त्वाच्या व्यापारी केंद्रात वाढती गुन्हेगारी ही केवळ स्थानिक प्रश्न नसून, व्यापक आर्थिक व्यवस्थेवर परिणाम करणारी बाब आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस आणि प्रभावी उपाययोजना राबविणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा, या गुन्हेगारीमुळे व्यापारी वर्गाचा विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.