कर्जत स्थानकातील समस्या मार्गी लावण्यासाठी सह्यांची मोहीम

स्थानकावर बंद थांबे पुन्हा सुरू करण्यासाठी प्रवाशांचा पुढाकार

By Raigad Times    11-Apr-2026
Total Views |
 karjat
 
कर्जत । कोरोना काळात कर्जत रेल्वे स्थानकावर बंद करण्यात आलेले रेल्वे गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर असोसिएशनकडून सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली असून, कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
 
कोरोना काळापासून अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांचे थांबे कर्जत स्थानकात रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्जतकर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याशिवाय स्थानकावरील विविध सुविधांमध्येही अनेक त्रुटी असल्याची बाब असोसिएशनने रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
 
प्रवाशांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पुणे-मुंबई मार्गावरील कोयना, चेन्नई, सिद्धेश्वर व राजकोट एक्सप्रेस गाड्यांना कर्जत स्थानकात अधिकृत थांबा देणे, कर्जत-पुणे-बारामती शटल सेवा सुरू करणे, सह्याद्री व कन्याकुमारी एक्सप्रेस सीएसएमटीवरून सुरू करणे, तसेच सर्व लोकल सेवा कर्जत मुख्य स्थानकातूनच सुरू व समाप्त करणे यांचा समावेश आहे.
 
याशिवाय जोधपूर, हैदराबाद, पंढरपूर व हुबळी एक्सप्रेस गाड्यांना थांबा देणे, तांत्रिक थांबा असलेल्या गाड्यांसाठी तिकीट सुविधा उपलब्ध करून देणे, कर्जत स्थानकाला जंक्शनचा दर्जा देणे, लोकल गाड्या वेळेवर चालवणे आणि ‘अमृत भारत’ योजनेत स्थानकाचा समावेश करणे, अशा मागण्या देखील करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने दिला आहे. तसेच या सह्यांच्या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.