माणगाव । माणगाव तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर अवैधरित्या सोलिव खैर लाकूड वाहतूक करणार्या वाहनावर वनविभागाने धाडसी कारवाई करत सुमारे 18 लाख 69 हजार 309 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित वाहनचालकाविरोधात वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे अवैध खैरतोड करणार्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (8 एप्रिल रोजी) सायंकाळी सुमारे 8.19 वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील विघवली येथे मुंबई-गोवा महामार्गावर संशयित टेम्पो थांबवून तपासण्यात आला. तपासादरम्यान संबंधित वाहनात अंदाजे 11.400 घनमीटर खैर सोलिव लाकूड विनापरवाना वाहतूक करत असल्याचे आढळून आले. या लाकडाची किंमत सुमारे 69 हजार 309 रुपये असून, टेम्पोची किंमत अंदाजे 18 लाख रुपये आहे.
अशा प्रकारे एकूण 18 लाख 69 हजार 309 रुपयांचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला. या प्रकरणी वाहनचालक नदीम अहमद (रा. वापी, जि. वलसाड, गुजरात) याच्यावर वन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई रोहा उपवनसंरक्षक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव व सहाय्यक वनसंरक्षक पांढरकामे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच दक्षता पथक ठाणेचे विभागीय अधिकारी रोशन राठोड आणि वनक्षेत्रपाल (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) रोहा विकास भामरे यांच्या देखरेखीखाली, माणगाव वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे यांच्या आदेशान्वये पथकाने ही कारवाई केली.
या मोहिमेत इंदापूर वनपाल सुजित राजमाने, कुशेडे वनरक्षक अजिंक्य कदम तसेच वनमजूर विठ्ठल दिघे आणि विवेक जाधव यांनी सक्रिय सहभाग घेतला. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या गस्ती दरम्यान ही कारवाई करण्यात आली. सदर प्रकरणाचा अधिक तपास माणगाव वनक्षेत्रपालांकडून सुरू असून, अवैध लाकूड तस्करीविरोधात वनविभागाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.