उरण । मुंबईजवळील जागतिक वारसा स्थळ घारापुरी (एलिफंटा) लेणी परिसरातील मोरा बंदर येथे सुरू असलेल्या उत्खननात महत्त्वपूर्ण शोध लागला असून, यामुळे या बेटाच्या प्राचीन व्यापारी इतिहासावर नवे प्रकाशझोत पडले आहेत.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), मुंबई मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत दोन प्रचंड आकाराचे साठवणूक जार सापडले आहेत. सध्या मोराबंदर परिसरात सहा वेगवेगळ्या ठिकाणी (पॉकेट्स) उत्खनन सुरू आहे. यापैकी एका महत्त्वाच्या पॉकेटमध्ये मिळालेली ही शोधसंपदा विशेष लक्षवेधी ठरली आहे.
उत्खननात सापडलेल्या जारपैकी एका जारची उंची सुमारे 1.25 मीटर आहे, तर दुसर्या तुटलेल्या जारचा व्यास सुमारे 1.22 मीटर इतका आहे. हे जार प्रामुख्याने पाणी साठवण्यासाठी वापरले जात असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या उत्खननात रोमन अॅम्फोरा, पश्चिम आशियातील टॉर्पेडो जार, चायनीज पोर्सिलेन तसेच ‘टर्क्वाइझ ग्लेझ वेअर’चे अवशेषही सापडले आहेत. या पुराव्यांवरून इसवी सनाच्या चौथ्या व पाचव्या शतकात मोराबंदर बंदराचा रोम आणि पश्चिम आशियाशी थेट व्यापार संबंध होता, हे स्पष्ट होते.विशेष म्हणजे, जार सापडलेल्या ठिकाणापासून सुमारे 80 मीटर अंतरावर विटांनी बांधलेली आणि खडकात कोरलेली पाण्याची टाकीही आढळली आहे.
या टाकीचा वापर कापड रंगविण्याच्या प्रक्रियेसाठी केला जात असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय उत्खननात लोखंडी गोळे, दगडी नांगर तसेच कलचुरी आणि क्षत्रप काळातील नाणीही सापडली आहेत. घारापुरीसारख्या खडकाळ बेटावर पाण्याची टंचाई असतानाही प्राचीन रहिवाशांनी आणि व्यापार्यांनी जलसाठ्यासाठी जलकुंभ आणि साठवणूक टाक्यांची उभारणी केली होती.
ही रचना त्या काळातील प्रगत अभियांत्रिकी कौशल्याचे द्योतक मानली जात आहे. हे साठवलेले पाणी जहाजांवरील प्रवाशांसाठी तसेच स्थानिक उद्योगांसाठी वापरले जात असावे. दरम्यान, सापडलेले महत्त्वपूर्ण अवशेष पावसाळ्यापूर्वी सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम एएसआयच्या सायन्स ब्रँचच्या सहकार्याने सुरू आहे. भविष्यात हे महाकाय जार पुनर्संचयित करून पर्यटकांच्या माहितीसाठी एलिफंटा लेण्यांच्या प्रवेशद्वारावर प्रदर्शनासाठी ठेवण्याची योजना आहे. या उत्खननात डेक्कन कॉलेज पोस्ट-ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट हे प्रमुख सहयोगी म्हणून कार्यरत असून, मुंबईतील के.जे. सोमय्या महाविद्यालय यांचाही सहभाग आहे.