अलिबाग | मध्य पूर्व आशियातील युध्दजन्य परिस्थितीमुळे रायगड जिल्ह्यातील २० नागरिक परदेशात अडकून पडले आहेत. कुवेत, सौदी आणि दुबई येथे अडकलेल्या या नागरिकांनी सुटकेसाठी जिल्हा प्रशासनाकडे संपर्क साधला असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
मध्य पूर्व आशियातील विविध देशांमध्ये कामानिमित्त, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी गेलेल्या रायगड जिल्ह्यातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत असून त्यांच्या स्थितीचा आढावा घेतला जात आहे. संबंधित नागरिकांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणतीही अडचण असल्यास जिल्हा प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील उत्कर्ष राजेश मपारा (मु. पाली, जि. रायगड) हा दुबईत शिक्षणासाठी गेला आहे.
तर उरण तालुक्यातील जसखार येथील कवीश विजय घरत आणि प्रांजली विजय घरत हे दांम्पत्य दुबईमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले आहेत. दुबईतील हे तिन्ही नागरिक सुरक्षित आहेत. यासोबत सर्फराज सुलतान तार्लेकर (रा. सवाद, ता.पोलादपूर), अख्तर कासीम तार्लेकर, अजीम कासीम तार्लेकर, महमद अब्दुल तार्लेकर, असलम महमूद तार्लेकर, मेहबूब फजलुद्दीन तार्लेकर, जमीर शौकत तार्ले कर, जावेद महमूद तार्लेकर, सुहेल जियारत तार्लेकर हे सौदी अरेबियात कामानिमित्त गेले आहेत.
सज्जाद सुलतान तार्लेकर हे दुबईत तर रतिक निजाम नैकवार, अल्ताफ अब्बास पठाण, अल्तमश अब्बास पठाण, आयान जमील तार्लेकर हे कुवेत तर शाहिद आयूब कादरी, मुजाहिद आयूब कादरी, शाहिद तोलकर कतार येथे गेले आहेत. या सर्वांनाच भारतात परतायचे आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले असून नागरिकांनी आवश्यक तपशीलासह माहिती द्यावी, असे सांगण्यात आले आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालय व राज्य शासनाच्या संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक ती मदत पुरविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.