नवी मुंबई | मध्यपूर्वेतील आखाती देशांतील तणावाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांवर झाला आहे. दुबई येथील प्रमुख आयात बाजारपेठ तात्पुरती बंद झाल्यामुळे भारतीय कांद्याची निर्यात थांबली असून जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) येथे निर्यातीसाठी सज्ज असलेले १५० हून अधिक कंटेनर अडकले आहेत.
लाखो टन नाशवंत कांदा बंदर परिसरात अडकल्याने तो खराब होण्याची भीती शेतकरी आणि निर्यातदार व्यक्त करत आहेत. दुबई ही भारतीय कांद्याची प्रमुख निर्यात बाजारपेठ असून विशेषतः नाशिक पट्ट्यातील कांदा मोठ्या प्रमाणावर आखाती देशांकडे पाठविला जातो.
मात्र जहाजवाहतूक, विमा प्रक्रिया आणि आयात व्यवहारांवर परिणाम झाल्याने माल स्वीकारण्यात दुबईतील व्यापारी पुढे येत नाहीत. निर्यात प्रक्रियेत अनिश्चितता निर्माण झाल्याने व्यापारी आणि शेतकरी दोघांचेही आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. देशांतर्गत बाजारातही कांद्याच्या दरांवर तीव्र दबाव आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) येथील २ मार्च २०२६ रोजीच्या दरांनुसार उत्तम प्रतीच्या ‘गोळा’ कांद्याला १२१३ रुपये किलो, मध्यम प्रतीच्या पत्ती कांद्याला ८११ रुपये किलो, ‘बिनापत्ती (सुका)’ कांद्याला ४५ रुपये किलो आणि ‘बिनापत्ती (ओला)’ कांद्याला २३ रुपये किलो भाव मिळाले.
उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक व पॅकिंग वजा केल्यावर शेतकर्यांच्या हातात काहीच उरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निर्यात बंदीमुळे स्थानिक बाजारात आवक वाढली असून पुरवठा जास्त आणि मागणी मर्यादित असल्यामुळे दर आणखी घसरण्याची भीती आहे. यावर होळी व धुळवडीच्या सणामुळे ३ मार्च रोजी बाजार समिती बंद राहणार असल्याने व्यवहारात खंड पडणार आहे. तसेच ५० किलो वजन मर्यादेच्या मुद्द्यावरून माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन केल्याने बाजार आवारात येणारा कांदा वेळेत उतरवला गेला नाही, ज्यामुळे खरेदी-विक्रीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यापार्यांनी व्यक्त केली आहे.
अडकलेले कंटेनर, वाढते साठवणुकीचे शुल्क, माल खराब होण्याचा धोका आणि कामबंद आंदोलन या चारही बाजूंनी कांदा उत्पादक संकटात आहेत. शेतकर्यांची मागणी आहे की दुबई बाजार पुन्हा सुरू होईपर्यंत पर्यायी निर्यात बाजारपेठ उपलब्ध करावी आणि दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी होत आहे.