मुरुड-जंजिरा | मुरुड जंजिरा परिसरात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेषतः मुरुड कोळीवाड्यात पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांच्या गजरात आणि विधिवत पूजनासह होलिका दहन आनंदात पार पडले. यंदा २ मार्च रोजी रात्री १२ वाजता होलिका दहन करण्यात आले. मुरुड तालुक्यात शिमगा (होळी) सणाचे आगळेवेगळे स्वरूप पाहायला मिळते.
कोळी समाजात हा सण विशेष उत्साहात साजरा केला जातो. प्रथेनुसार सुमारे १५ दिवस आधी होळीच्या माळावर खड्डा खणून त्यात रात्री सुपारीचे झाड जाळण्याची परंपरा आहे. दिवसभर वाद्यांच्या गजरात सुपारीचे झाड बाजारात आणले जाते. त्यावेळी झाड उंच उडवण्याची स्पर्धा रंगते.
एका झाडासोबत सुमारे २५ हौशी युवक सहभागी होतात. अगरदांडा, खरआंबोळी, उंडरगाव,डोंगरी आदी गावांतील पथकेही यात सहभागी होतात. हा अनोखा खेळ पाहण्यासाठी नागरिकांसह विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. शिमगा सणाचा मुख्य टप्पा म्हणजे कोळीवाड्यातील मध्यरात्रीचे होलिका दहन.
कोळीवाडे विद्युत रोषणाईने सजवले जातात. महिला पारंपरिक एकसमान वेशभूषेत होळीभोवती ढोल- ताशांच्या तालावर फेर धरतात. सुपारीच्या झाडाला होलिका मातेस स्वरूप देऊन पूजन केले जाते व नवस बोलले जातात. पूजनानंतर मंत्रोच्चारात होळी प्रज्वलित केली जाते. होळी विझेपर्यंत नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू राहतात.