अलिबाग | कोकणात शिमगोत्सव सुरु आहे. यानिमित्ताने विविध लोककला, पारंपारिक नृत्य आणि पालखी सोहळेही उत्साहात सुरू आहेत. चाकरमानी गावाकडे आलेल्या उत्सवामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हा उत्सव रंगपंचमीपर्यंत सुरू राहणार आहे.
होळीकोत्सवातील पालखी सोहळ्यांदरम्यान शरणे काढण्याची परंपरा आजही दक्षिण रायगडमध्ये जपली जात असल्याचे दिसत आहे. फाल्गुन पंचमीपासून सुरू झालेल्या शिमगोत्सवाला कोकणात गणेशोत्सवाइतकेच महत्त्व आहे. जिल्ह्यात सर्वत्र होळीचा सण साजरा केला जात असला तरी दक्षिण रायगडातील महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन आणि रोहा या तालुक्यांमध्ये होळीचा उत्साह वेगळा असतो.
या भागात तब्बल १५ दिवस होळीचा उत्सव रंगतो आणि ग्रामस्थ ही परंपरा आजही जपत आहेत. दररोज गावाबाहेर मोकळ्या जागेत होळी लावली जाते. त्यासाठी मुले कंपनी घरोघरी जाऊन लाकूडफाटा आणि गवत गोळा करतात. होळीचे चार दिवस सुरू झाल्यानंतर गावोगावच्या ग्रामदेवतांच्या पालख्या भाविकांच्या घरी दर्शनासाठी निघतात. घरोघरी ग्रामदेवतेचे पूजन-अर्चन केले जाते, नवस बोलले जातात आणि फेडले जातात. या देवतांना नवस बोलल्यास ती पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मुंबई-पुण्यात नोकरी किंवा व्यवसायासाठी स्थायिक झालेले चाकरमानी हजेरी लावतात. यादरम्यान पालखी नाचवण्याची पारंपरिक कला कोकणी जनतेने जोपासली आहे.