वाहतूक कोंडीत चाकरमानी पुन्हा रखडले , प्रवाशांचा संताप,पुढार्‍यांच्या नावाने शिमगा

By Raigad Times    04-Mar-2026
Total Views |
mangoan news
 
माणगाव | सणासुदी कोकणात परतणार्‍या चाकरमान्यांना पुन्हा एका वाहतुकीचा सामना करावा लागला. माणगाव आणि इंदापूर परिसरात वाहनांच्या रांगा, उन्हात अडकलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची होणारी परवडयामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना उसळली आहे.
 
ऐन शिमग्याच्या काळातच लोकांनी पुढार्‍यांच्या नावाने "शिमगा” करत आपला संताप व्यक्त केला. माणगाव आणि इंदापूर येथील बायपास रस्त्याचे काम वर्षानुवर्षे रखडल्यामुळे कोकणात जाणार्‍या पर्यटकांना आणि चाकरमान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून होळीच्या सुट्ट्यांमुळे लाखो कोकणवासीय गावाकडे निघाले, परंतु रस्त्यावर तासनतास कोंडीत अडकून त्यांचा उत्साह मावळला.
 
नियमभंग करणारे काही वाहनचालक किरकोळ अपघात घडवत असल्याने कोंडी आणखी वाढते, तर रस्त्यावरील अपूर्ण कामे, खड्डे आणि अरुंद मार्ग परिस्थिती अधिक गंभीर करतात. माणगाव पोलिसांनी वाहतूक नियंत्रण, ठिकठिकाणी बंदोबस्त आणि पर्यायी मार्गांचा सल्ला देऊन कोंडी कमी करण्याचे प्रयत्न केले, परंतु मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत. उन्हात उभे राहून कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांनाही मोठा ताण सहन करावा लागतो.
 
मुंबई-गोवा महामार्गावरील बायपास कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री यांनी अनेकवेळा मुदती जाहीर केल्या; तरी तब्बल १७ वर्षांनंतरही बायपास पूर्णत्वास आलेले नाही. यावरून नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून होळीच्या उत्सवात विविध पक्षांचे पदाधिकारी आश्वासने देतात, अशी उपरोधिक टीका करत संतप्त प्रवाशांनी "खोट्या आश्वासनांचे दहन” केले असल्याचे प्रतीकात्मक विधान केले.
 
रुग्णवाहिका अडकणे, लहान मुलांचे रडणे आणि ज्येष्ठ नागरिकांचा त्रास या सगळ्यामुळे प्रवाशांचा संताप उफाळला. "सण साजरा करायला निघालो आणि रस्त्यातच अडकलो,” असे अनेकांनी व्यक्त केले. नागरिकांची एकमुखी मागणी आहे की बायपासचे काम तातडीने पूर्ण करावे आणि सुरक्षित, सुरळीत वाहतूक व्यवस्था सुनिश्चित करावी. होळीच्या रंगात न्हालेल्या कोकणात यंदा संतापाचा लाल रंग अधिक गडद दिसतो आहे. प्रवाशांची ही "बोंबाबोंब” केवळ नाराजी नाही, तर प्रशासनाला दिलेली ठाम चेतावणी आहे; आता आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष कृती हवी!