पाली/वाघोशी | रायगड जिल्ह्यातील होळी सण या वर्षी सामाजिक व सेवाभावी पद्धतीने साजरा करण्यात आला. अनेक सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांमुळे तसेच दानशूर नागरिकांच्या सहकार्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) यांच्या माध्यमातून शेकडो पुरणपोळ्या आदिवासी वाडी, झोपडपट्टी आणि वृद्धाश्रमातील गरजूंना वाटण्यात आल्या.
पालीत या उपक्रमाद्वारे समाजातील एकता आणि सेवाभावाचे प्रेरणादायी उदाहरण दिसून आले. महा. अंनिस तर्फे मागील अकरा वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबविला जात आहे. या वर्षी पालीतील छोट्या-मोठ्या होळ्या येथून जवळपास एक हजाराहून अधिक पुरणपोळ्या जमा करण्यात आल्या. याशिवाय फळे, पापड व फेण्याही वाटपासाठी गोळा करण्यात आल्या. तळई व दापोडे आदिवासीवाडी तसेच टेंभी वसाहत येथे या वस्तूंचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमात मयूर थळे, श्रीकांत ठोंबरे, संदेश सोनकर, संदीप महाडिक, किशोर चौधरी, रोशन रुईकर आणि अमित निंबाळकर यांनी महत्वाची भूमिका बजावली. तर रोहा महा. अंनिस शाखेच्या वतीने माळखंड वाडी येथील श्री काळकाई प्रसन्न वृद्धाश्रमामध्ये पुरणपोळ्या आणि फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी रोहा शाखा अध्यक्ष डॉ. फरीद चिमावकर, उपाध्यक्ष दत्तात्रेय शेडगे, सचिव दिनेश शिर्के तसेच अनिकेत पाडसे, मुमताज मुलानी, धनाजी जाधव आणि प्रमोद खांडेकर उपस्थित होते. याचबरोबर पेण महा. अंनिस शाखेतर्फे पेण रेल्वे लाईनजवळील झोपडपट्टीतील लहान मुले व महिलांनाही पुरणपोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी रमाकांत घरत आणि संदेश गायकवाड उपस्थित होते. या सर्व उपक्रमांमुळे गरिब व वृद्धांचा होळीचा सण गोड आणि आनंददायी झाला.
होळी करा लहान पोळी करा दान हा उपक्रम अनेकांनी उत्स्फूर्तपणे अवलंबला आहे. बहुतांश होळी मंडळे आणि रोटरी लब सारख्या संस्था स्वतः पुरणपोळ्या वाटप करू लागल्या आहेत. ही एक चांगली आणि स्वागतार्ह बाब आहे. जो विचार फक्त आमचा होता तो आता आपल्या सर्वांचा झाला आहे. होळी सणाच्या या विशेष प्रसंगी, समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन गरिबांना आनंद आणि आशेचा संदेश दिला आहे. हा उपक्रम समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने यशस्वी झाला आहे. - संदेश गायकवाड, कार्याध्यक्ष, महा. अंनिस, रायगड.