महाड | ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी वर्ष प्रारंभ झाले असून हे वर्ष महाराष्ट्र शासन समता व समरसता वर्ष म्हणून साजरे करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाड येथे केली.
समता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करत भेदभावमुक्त समाज घडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त करतानाच बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाड येथे चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या शताब्दी वर्षाची सुरुवात शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. चवदार तळ्याचे जलशुद्धीकरण आणि परिसराचे सुशोभीकरणासाठी ५५ कोटी ८० लाख निधी मंजूर करण्यात आला असून या कामांचे भूमिपूजनही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, खा. सुनील तटकरे, खा. धैर्यशील पाटिल, आ. प्रवीण दरेकर, महाडचे नगराध्यक्ष सुनिल कविस्कर, प्रधान सचिव, डॉ. हर्षदीप कांबळे, दीपा मुधोळ-मुंडे आयुक्त, समाज कल्याण, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, आदी अधिकारी, विविध सामाजिक संघटना आणि राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी चवदार तळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णांकृत पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करुन मानवंदना देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आपल्या भाषणाची सुरुवात करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, १९२३ मध्ये सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले करण्याचा कायदा झाला असला तरी समाजातील काही घटकांनी त्याची अंमलबजावणी रोखली. या अन्यायाविरोधात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेला चवदार तळे सत्याग्रह हा सामाजिक समतेचा क्रांतिकारी टप्पा ठरला.
"हा संघर्ष केवळ पाणी पिण्यासाठी नव्हता, तर विषमता आणि अस्पृश्यतेच्या व्यवस्थेविरुद्ध उभारलेला मानवतेचा लढा होता,” असे त्यांनी अधोरेखित केले. या सत्याग्रहामुळे देशातील सर्व सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले झाले आणि समतेची पायाभरणी झाली, असे सांगत त्यांनी पुढील पिढीपर्यंत हा संघर्षाचा इतिहास पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाचा उल्लेख करत, हे ठिकाण स्वच्छ, पवित्र आणि प्रेरणादायी स्वरूपात विकसित केले जाईल, असे सांगितले. तसेच राज्य सरकारतर्फे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अनुसूचित जातींवरील अत्याचारातील पीडित कुटुंबातील ९८ जणांना शासकीय नोकर्या देण्याचा निर्णय, पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दिलेला निधी, चैत्यभूमीवरील स्मारकाचे काम, तसेच लंडन व जपानमध्ये बाबासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी केलेल्या उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला. याशिवाय, बौद्धगया येथे महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला. बाबासाहेबांच्या नावाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यासन स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
"भारतीय संविधानाने प्रत्येकाला समान हक्क दिले आहेत. या संविधानामुळेच भारत प्रगतीच्या मार्गावर आहे. त्यामुळे विषमता आणि अस्पृश्यता संपवून समतामूलक समाज निर्माण करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा,” असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. केंद्रीय राज्यमंत्री, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार रामदास आठवले यांनी आपल्या अनोख्या काव्य शैलीत भाषणाची सुरुवात केली. महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी भव्य ‘भीमसृष्टी’ स्मारक उभारण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ५५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले असून, या ऐतिहासिक स्थळाचा जागतिक दर्जावर विकास करण्यावर भर देण्यात आला.

बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समानता व सामाजिक न्यायाच्या विचारांचा पुनरुच्चार करत समाजातील एकजूट अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच संविधान अत्यंत मजबूत असून ते बदलण्याच्या अफवा निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देश आणि राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. महाड येथील चवदार तळ्याच्या विकासासाठी ५५ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगत आमदार भरत गोगावले यांनी हा प्रकल्प शताब्दी वर्षापूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
देशभरातून येणार्या अनुयायांसाठी येथे आधुनिक सुविधा निर्माण करण्यावर भर देत, रायगड येथे ‘शिवसृष्टी’ आणि महाड येथे ‘भीमसृष्टी’ उभारण्याची मागणी त्यांनी केली. या ऐतिहासिक स्थळांचा सर्वांगीण विकास करुन सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा अधिक भक्कम करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रास्ताविक भाषणात महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या विकासासाठी सुमारे ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या ठिकाणाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प व्यक्त केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची सुरुवात याच ठिकाणाहून झाल्याने या स्थळाला जागतिक स्तरावर नेण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिक्षण, वसतिगृह आणि सामाजिक योजनांद्वारे बहुजन समाजाच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील वारसांपैकी ९८ वारसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय सेवेत नियुक्ती आदेश वितरण करण्यात आले.