अलिबाग | राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत महिला स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मिनी सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (२० मार्च) महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. अलिबाग समुद्र किनार्याजवळील मैदानावर चार दिवस हा महोत्सव सुरु राहणार आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून हे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटनानंतर ना.अदिती तटकरे यांनी, हे प्रदर्शन केवळ विक्रीसाठी नाही. तर केंद्र सरकारच्या लखपती दीदीची माहितीही देण्यात येणार आहे. बचतगटांचा उत्साह पाहून आनंद झाला. पुढील काळात बचतगटांना एवढे सक्षम करण्यासाठी काम करूया की प्रत्येक तालुक्यात असे प्रदर्शन भरतील, असे आवाहन महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केले.
यावेळी राजिप अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, गटनेते वैकुंठ पाटील, पक्षप्रतोद अमित नाईक, जि. प. सदस्य अभिषेक विचारे, प्रभाकर म्हात्रे, जनार्दन भस्मा, संतोष बैलमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जालिंदर पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपुरे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी राहुल कदम, कार्यकारी अभियंता विनायक तेलंग, महिला व बालकल्याण समिती अधिकारी निर्मला कुचिक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या.
जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी येणार्या जिल्हा परिषद अर्थसंकल्पात महिला बचतगटासाठी मोठी तरतूद केली जाईल असे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष मधुकर पाटील, गटनेते वैकुंठ पाटील, संतोष बैलमारे यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविकामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी, जिल्ह्यात १९ हजार ५६५ महिला स्वयंसहाय्यता गट असून फिरते कर्ज, बँकेकडून कर्ज उपलब्ध करून २ कोटी ८९ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच उमेद अंतर्गत अॅपवर १०० बचतगटांची नोंदणी करण्यात आली आहे. आभार प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी केले.