मुरुडमध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार ; ५२ वर्षांच्या नराधम अटकेत

By Raigad Times    21-Mar-2026
Total Views |
 murud
 
मुरुड-जंजिरा | मुरुड तालुक्यातील एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ५२ वर्षीय इसमाने हे कृत्य केले असून, त्याला तातडीने अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या घटनेमुळे मुरुडमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घराजवळ खेळत असताना आरोपीने तिला गोड बोलून आपल्या घरी नेले. तेथे तिच्याशी अश्लील वर्तन करत मोबाईलमधील अश्लील फोटोही दाखवले. घाबरलेल्या मुलीने घरी परतल्यानंतर संपूर्ण प्रकार आईला सांगितला.
 
यानंतर कुटुंबियांनी तातडीने मुरुड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी वेळ न दवडता त्या इसमाला अटक करत पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश रसेडे करीत आहेत.