महाड | महाडमधील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा ९९ वा वर्धापन दिन शुक्रवारी, २० मार्च रोजी महाड येथे दिमाखात साजरा होत आहे. या वर्षापासून चवदार तळे सत्याग्रहाच्या शतक महोत्सवी वर्षाला प्रारंभ होत असल्याने या सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांसह अनेक नेते महाडमध्ये येणार आहेत. चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९ व्या वर्धापन दिना निमित्त चवदार तळ्याचा परिसर रोषणाईने उजळून गेला आहे. त्याच बरोबर क्रांती स्तंभ व चवदार तळे येथे मंडप उभारण्यात आले आहे.
शासनातर्फे चवदार तळे सौदर्यीकरणासाठी ५५ कोटींचा निधी मंजुर केला असून या कामाचे भुमीपुजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लाखो भीम अनुयायी महाडमध्ये कालपासून दाखल होऊ लागले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात महाडचे आमदार व विद्यमान मंत्री भरत गोगावले यांच्या प्रयत्नातून २० मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चवदार तळे येथे शासनातर्फे पोलीस मानवंदना सुरु करण्यात आली.
गेल्या तीन वर्षांपासून ही मानवंदना दिली जात असून आजही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली जाणार आहे. यानिमित्ताने क्रांती स्तंभासमोरील मैदानात मुख्यमंत्री फडणवीस यांची अभिवादन सभा होणार असून यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर लाखोच्या संख्येने येणार्या भीम अनुयायांच्या पिण्याचे पाणी, जेवण नाष्टा, राहण्याची व स्वच्छतागृहाची व्यवस्था महाड नगर परिषदे मार्फत करण्यात आली आहे.
काँग्रेसचा चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष सोहळा;काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, तुषार गांधी, उल्का महाजन यांची उपस्थिती
महाड | राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ या दिवशी महाड येथे चवदार तळ्यावर सत्याग्रह केला होता. या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शुक्रवार २० मार्च रोजी महाड चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष सोहळा शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महात्मा गांधी यांचे पणतू ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्यासह अनेक मान्यवर नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. सामाजिक न्यायाशिवाय समता प्रस्थापित होणार नाही आणि समतेशिवाय डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत लोकशाही प्रत्यक्षात अवतरणार नाही.
हे लक्षात घेऊन "सामाजिक न्यायातून समतेकडे” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून हे शताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.