अलिबाग | कोकणच्या विकासाला नवे पंख देणारा रेवस-करंजा खाडी पूल आणि सागरी महामार्गावरील सात प्रमुख पूल प्रकल्प वेगाने पुढे सरकत आहेत. धर्मतर खाडीवर सुमारे २.०४ किमी लांबीचा मुख्य पूल आणि एकूण १०.६५ किमीचा मार्ग असलेला हा महाप्रकल्प ३००० कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा असून मार्च २०२८ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट आहे.
सध्या सुमारे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या सेतूमुळे दक्षिण मुंबई ते अलिबागचा सुमारे २.५ तासांचा प्रवास अवघ्या ७५ मिनिटांत होणार आहे. तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण ते अलिबाग हे ५५ किमीचे अंतर सुमारे ३० किमीवर येईल. उद्योग, लॉजिस्टिक्स आणि दैनंदिन प्रवासासाठी हा बदल मोठा ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. रेवस-रेडी सागरी महामार्ग या ४९८ किमी लांबीच्या किनारी महामार्गावर रेवस-करंजासह एकूण सात मोठे खाडी पूल उभारले जात आहेत.
या पुलांमुळे रेवस ते रेडीपर्यंतचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि अखंड होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात बोट सेवा बंद असताना बारामाही रस्तामार्ग उपलब्ध राहणार असल्याने स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील नागरिकांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीटी बंदराशी थेट व वेगवान कनेक्टिव्हिटी मिळेल. निर्यात-आयात सुलभ होऊन उद्योग क्षेत्राला चालना मिळणार आहे.
तसेच पर्यटन क्षेत्रालाही मोठी गती मिळेल. अलिबाग, श्रीवर्धन, हरिहरेश्वरसारख्या किनारी भागांत पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. वाहतूक सुलभ झाल्याने हापूस आंबा, मासे आणि इतर कृषी उत्पादने बाजारपेठेत जलद पोहोचतील. रिअल इस्टेट आणि स्थानिक व्यवसायांना नवी उभारी मिळेल. रोजगारनिर्मिती वाढून कोकणच्या आर्थिक विकासाला बळ मिळेल. एकूणच, खाडीवर उभा राहणारा हा विकासाचा सेतू उद्योग, पर्यटन, शेती आणि दळणवळण या सर्व क्षेत्रांना जोडणारा हा प्रकल्प रायगडसह संपूर्ण कोकणसाठी सुवर्णसंधी ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.