टी-२० विश्वचषकः वेस्ट इंडीजला नमवून भारत उपांत्य फेरीत

By Raigad Times    02-Mar-2026
Total Views |
 kolkatta news
 
कोलकत्ता | टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीतील सामन्यात टीम इंडियाने दबावाखाली दमदार कामगिरी करत वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने शानदार विजय मिळवला. १९६ धावांचं आव्हान समोर असताना क्षणभर सामना विंडीजच्या बाजूने झुकला होता, मात्र संजू सॅमसनच्या तुफानी खेळीने भारताने खेळाचा चेहरामोहराच बदलला.
 
रोमेन पॉवेल आणि जेसन होल्डर यांच्या फटकेबाजीमुळे उभ्या राहिलेल्या १९५ धावांच्या भक्कम डोंगरावर भारतीय फलंदाजांनी धडाकेबाज चढाई करत सेमीफायनलचं तिकीट पक्कं केलं. आता ५ मार्चला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध होणार्‍या महासंग्रामाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
 
वेस्ट इंडिजला पराभूत केल्यानंतर आता टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे. भारताचा सेमीफायनलचा सामना ५ मार्च रोजी मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध भारत हा सामना होणार आहे.