पनवेल | पनवेल महानगरपालिकेत रस्ते बांधणीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची बाब लक्षात घेऊन ठेकेदार आणि संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गट रायगड उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांनी महापौर नितीन पाटील यांच्याकडे ही मागणी केली.
पनवेलमध्ये रस्त्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे रस्ते फक्त १ ते २ महिन्यांतच खराब होतात. राजकारणी हस्तक्षेपामुळे अनेकदा अनुभवहीन ठेकेदारांना मोठ्या निविदा दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे कामाचा दर्जा खालावतो आणि निविदा प्रक्रिया पारदर्शक राहात नाही, परिणामी भ्रष्टाचाराला चालना मिळते. सरकारी बांधकाम, दुरुस्ती आणि नवीन बांधकामांमध्ये ठोस नियम निश्चित आहेत.
त्यानुसार, डांबरी रस्त्याचे आयुष्य १५ वर्षे, सिमेंट काँक्रीट रस्त्याचे ३० वर्षे, आणि पूलाचे १०० वर्षे गृहीत धरले गेले आहे. या आदेशाचा पनवेल महानगरपालिका अंतर्गत सर्व संबंधित अभियंते आणि अधिकार्यांवर लागू होतो. पनवेलमध्ये पावसाळ्यापूर्वी केलेले डांबरी रस्ते १-२ महिन्यांतच खराब झाल्यामुळे शिवसेना संघटनेने यापूर्वी आंदोलन करून महानगरपालिकेला कुलूप लावले होते.
त्यावेळी निकृष्ट कामांबाबत ठेकेदार आणि पर्यवेक्षकांवर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पनवेल शिवसेना संघटक दीपक निकम, पनवेल शहर प्रमुख यतिन देशमुख आणि शहर प्रमुख प्रवीण जाधव उपस्थित होते. ठाकरे शिवसेनेच्या म्हणण्यानुसार, शासन आदेशाचे पालन करून पालिकेतील रस्ते बांधणी कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.