अलिबाग | डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा तर्फे रविवारी (दि. १ मार्च) स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले. या उपक्रमात एकूण ३७.५ टन कचरा गोळा करण्यात आला आणि २,४७६ स्वयंसेवक सहभागी झाले.
अभियानात ३२.३० किलोमीटर लांब रस्ते, १६,७८७.०६ चौरस मीटर सरकारी कार्यालये, रुग्णालये व इतर परिसर, तसेच ५ किलोमीटर समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला. संकलित कचरा नंतर डंपिंग ग्राऊंडपर्यंत नेण्यात आला. डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडामार्फत सातत्याने समाजउपयोगी उपक्रम राबवले जातात.
यामध्ये प्रामुख्याने वृक्ष लागवड व संवर्धन, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, दाखले व शैक्षणिक साहित्य वाटप, पाणपोई व आपत्तीग्रस्तांना मदत यांसारखे अनेक उपक्रम समाविष्ट आहेत.