नवी मुंबई | नवी मुंबईतील नागरिकांचे हक्काचे घर मिळवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सिडको महामंडळाने ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेसाठी पर्याय निवडीसाठी मुदतवाढ जाहीर केली आहे. आधी १६,८७६ घरांच्या योजनेसाठी पर्याय निवडीची अंतिम तारीख वाढवून आता १९ मार्च २०२६ पर्यंत करण्यात आली आहे.
सिडकोने नागरिकांकडून मिळणार्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढती मागणी लक्षात घेता ही मुदतवाढ केली आहे, ज्यामुळे अधिकाधिक लाभार्थ्यांना या योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गट (एलआयजी) यांच्यासाठी एकूण १६,८७६ सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत.
घरांची रचना सर्वसामान्य कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आली असून, परवडणार्या दरात दर्जेदार निवास उपलब्ध होईल, असा दावा सिडकोने केला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सान्निध्यात उभारण्यात येणार्या गृहसंकुलांना रेल्वे, महामार्ग तसेच मेट्रोद्वारे उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी लाभते. त्यामुळे रहिवाशांना दैनंदिन प्रवास सुलभ होईल तसेच आधुनिक शहरी जीवनशैलीचा फायदा मिळेल. योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी अनामत रक्कम (ईएमडी) भरून पसंतीचे पर्याय निवडण्याची अंतिम मुदत १९ मार्च २०२६ आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ हीींिं://ुुु.लळवलेहेाशी.लेा ला भेट द्यावी.
माझे घर योजनेसंदर्भातील सर्व अधिकृत व अद्ययावत माहिती फक्त सिडकोकडून प्रसिद्ध करण्यात येणार्या पत्रकांद्वारे आणि अधिकृत समाजमाध्यमांवरून मिळवावी; अफवांवर किंवा अप्रमाणित माहितीस विश्वास ठेवू नये. अधिकाधिक नागरिकांनी ही संधी साधून नवी मुंबईत आपल्या हक्काचे घर मिळवावे. - प्रिया रातांबे, सिडको जनसंपर्क अधिकारी