पेण | थोर समाजसुधारक डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त पेण तालुक्यातील श्री सदस्यांनी पेण शहरात भव्य स्वच्छता मोहीम राबवत सुमारे १५ टन कचरा गोळा केला. या उपक्रमात तालुक्यातील १५ बैठकांमधील एकूण ९७० श्री सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
पेण, दादर, वरवणे, सापोली, हनुमान पाडा, वरसई, धावटे, वाशी, रावे, वडखळ, आंबिवली, भाल, वाशीनाका, जिते आणि शिर्की येथील श्री सदस्यांनी रविवारी (ता. १) सकाळपासून शहरातील विविध भागांत स्वच्छता अभियान राबविले. तहसील कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, फौजदारी व दिवाणी न्यायालय, बस स्थानक, रामवाडी बसस्थानक, एस.टी. विभागीय कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, रेल्वे स्टेशन, वैकुंठधाम स्मशानभूमी आदी प्रमुख शासकीय ठिकाणांसह शहरातील अंतर्गत सुमारे २१ कि.मी. रस्त्यांवर स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत ४.३५५ टन ओला व ११.२०० टन सुका कचरा संकलित करण्यात आला.
जमा झालेला कचरा शहराबाहेरील डम्पिंग ग्राऊंड येथे नेऊन टाकण्यात आला. विशेष म्हणजे कोणताही गाजावाजा किंवा प्रसिद्धी न करता शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा उपक्रम पार पडला. यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी सांगितले की, "जिथे भक्ती आणि शक्ती असते, तिथे शांतता असते, हे श्री सदस्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चे कार्य हे केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित नसून संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची चळवळ आहे.
बैठकींच्या माध्यमातून अंतरमन स्वच्छ करण्याबरोबरच शहर आणि गाव स्वच्छ ठेवण्याचा आदर्शही निर्माण केला जात आहे.” शहरातील नागरिकांनी हा आदर्श घेऊन स्वच्छता कायम राखावी, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू केलेले कार्य डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे सुरू आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छतेबरोबरच व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, आरोग्य शिबिरे तसेच देशातील सर्वात मोठ्या रक्तदान शिबिराचे आयोजन अशी विविध सेवाभावी उपक्रम राबविले जातात.
या कार्याची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली असून प्रतिष्ठानचे कौतुक केले आहे. या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, नगरसेवक अजय क्षीरसागर, मितेश शहा, अभिराज कडू, नगरसेविका कलावती पाटील, जस्विन पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील, आरोग्य निरीक्षक दयानंद गावंड आदी मान्यवर उपस्थित होते.