मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; कारवर कंटेनर उलटून ३ ठार, ५ जखमी

By Raigad Times    19-Mar-2026
Total Views |
khopoli
 
खोपोली | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. बोरघाट येथील खोपोली एक्झिटजवळ भरधाव वेगातील एका कंटेनरने नियंत्रण गमावून पाच वाहनांना धडक दिल्यानंतर थेट एका कारवर पलटी घातली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.
 
बुधवारी सकाळी ९:४० च्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर चालक अवधेश यादव याचे वाहन नियंत्रणाबाहेर गेले आणि महामार्गावर वाहनांना धडक देऊ लागले. कंटेनरने आधी एका कारला, नंतर दुसर्‍या कारला आणि एका आयशर टेम्पोला धडक दिली.
 
पुढे समोरच्या एसयूव्ही कारवर थेट कंटेनर पलटी मारल्याने गाडीचा पत्र्याचा गोळा झाला. या भीषण धडकेत प्रवासी श्रीकांत अनंत जाधव (६३, पुणे), अंबादास दामू पेटारे आणि प्रमोद संतोष पवार यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये टाटा टिगोरमधील प्रवासी स्वप्नील भुजबळ, नवनाथ भुजबळ, अक्षय गायकवाड, भानुदास गायकवाड आणि कंटेनर चालक अवधेश यादव यांचा समावेश आहे.
 
त्यांच्यावर खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचा आवाज होताच बोरघाट व खोपोली पोलीस, आयआरबीचे पथक, डेल्टा फोर्स आणि हेल्प फाऊंडेशनचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने इनोव्हावर पडलेला कंटेनर काढण्यात आला आणि अडकलेल्या प्रवाशांना सुटका करण्यात आली. काही काळ मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती, मात्र पोलिसांच्या युद्धपातळीवर कामामुळे रस्ता पुन्हा मोकळा झाला.
 
याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात कंटेनर चालक अवधेश यादव विरोधात हलगर्जीपणा व भरधाव वेगाने वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरघाट परिसरातील तीव्र उतार आणि वाहनांचा वेग यामुळे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.