अलिबाग | कोकण किनारपट्टीवर राहणार्या मच्छिमारांचे मासेमारी हे उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. निसर्गाची लहर आणि वातावरणावर हा व्यवसाय अवलंबून असतो. अनेकदा मत्स्य दुष्काळाचाही सामना करावा लागतो. मात्र रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांसमोर आता समुद्र शैवाल शेती करण्याचा पर्याय पुढे आला आहे.
यासाठीचे तांत्रिक मार्गदर्शन डिपी वर्ल्ड, आयएनईसीसी आणि क्लायमा क्र्यू यांच्या माध्यमातून सुरु आहे. जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीवर आतापर्यंत २५० पेक्षा अधिक समुद्र शैवाल लागवडीची युनिट्स उभारण्यात आल्या आहेत. एका चक्रात २ हजार २५ टन ओल्या समुद्र शैवालाचे उत्पादन मिळत असून, हंगामाच्या शेवटी हे उत्पादन ५ हजार ७५ टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. समुद्र शैवाल शेतीतून मच्छिमारांना उत्पन्न मिळत असून, स्थानिक लोकही या उपक्रमात सहभागी होत आहेत.
आयएनईसीसी आणि क्लायमा क्र्यू या संस्थेने नुकतेच अलिबाग तालुक्यातील सारळ येथे समुद्र शैवाल शेतीसाठी तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी अनेक मच्छिमार सहभागी झाले होते. या प्रकल्पामुळे समुद्रातील पाण्याची गुणवत्ता सुधारते. तसेच कोळंबी, खेकडे आणि लहान मासे यांसारख्या सागरी जीवांसाठी सुरक्षित अधिवास तयार होतो, असे सांगण्यात आले. यावेळी डिपी वर्ल्डचे विभागीय संचालक सी.एम. मुरलीधरन यांनी, "समुद्र शैवाल शेतीमुळे किनारी राहणार्या समाजाला हवामान बदलाच्या धक्क्यांना तोंड देणारी शाश्वत उपजीविका मिळते.
लोकांना शाश्वत उपाय उपलब्ध झाले तर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात आणि त्यांचा परिसरातील पर्यावरणीय संतुलनही टिकून राहते”, असे म्हटले आहे. तर आयएनईसीसीचे कार्यकारी संचालक मायरोन मेंडेस यानंतर मासेमारीत घट, अनिश्चित हंगाम आणि उपजीविकेतील अस्थिरतेमुळे मच्छिमारांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. समुद्र शैवाल शेती हा उत्पन्न वाढविण्याबरोबरच समुद्राच्या आरोग्यासाठीदेखील उपयुक्त असल्याचे म्हटले आहे. ‘क्लायमा क्र्यू’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी देवलीना भट्टा यांनी, ‘लोक, पर्यावरण आणि नफा’ यांचा समतोल साधणारी ही प्रणाली आहे. समुद्र शैवाल शेती वेगाने बळ देणारा पर्याय ठरतो, असे म्हटले आहे.