नवी मुंबई विमानतळाला, दि.बा. पाटील यांचे नाव लवकरच!

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच प्रस्ताव ; खासदार बाळ्या मामा यांची माहिती

By Raigad Times    16-Mar-2026
Total Views |
new mumbai
 
नवी मुंबई | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव लवकरच देण्यात येणार असून हा निर्णय स्थानिक भूमिपुत्रांचा विजय असल्याचे मत खासदार बाळ्या मामा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यासाठीचा प्रस्ताव लवकरच केंद्रीय कॅबिनेट बैठकीत सादर केला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
नवी मुंबई विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आगरी- कोळी समाजाने अनेक आंदोलने केली असून, मागील काही वर्षांपासून संसदेतही या संदर्भात मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबतच्या पाठपुराव्यासाठी खा. बाळ्यामामा केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हा प्रस्ताव लवकरच केंद्रीय कॅबिनेट बैठकीत सादर केला जाणार असल्याचे सांगितले. येत्या काही दिवसांत विमानतळाचे नामकरण निश्चित होणार आहे.
 
खासदार बाळ्या मामा म्हणाले की, हा निर्णय स्थानिक समाजाच्या इच्छेची पूर्तता आहे आणि लोकसंपर्कात सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. दरम्यान, यावेळी खासदार बाळ्या मामा यांनी रेल्वे संबंधितही सूचना दिल्या. भिवंडी रोड रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबत नसल्यामुळे प्रवाशांना मोठी गैरसोय होत होती.
 
केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसमोर या समस्येचे मुद्दे मांडल्यावर, दिवावसई मार्गावरून जाणार्‍या सात गाड्यांपैकी तीन गाड्या भिवंडी रोड रेल्वे स्थानकात थांबण्याचे आश्वासन मिळाले आहे. तसेच, वाशिंद येथील तिसराचौथा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर दिवावसई मेमु ट्रेन थेट मुंबई सीएसटीपर्यंत पोहोचेल, असेही आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिले आहे.