राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा सुनील तटकरे

By Raigad Times    28-Feb-2026
Total Views |
 ALIBAG
 
अलिबाग | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची निवड करण्यात आली. यासोबतच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांच्याकडे पुन्हा एकदा जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘राष्ट्रीय अधिवेशन २०२६’ मुंबईतील वरळी येथे पार पडले.
 
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे तसेच पक्षातील पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना खा. तटकरे यांनी,अजितदादांची दुर्दम्य राजकीय इच्छाशक्ती, प्रचंड क्षमता, लोकांशी संवाद करण्याची हातोटी यामुळेच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ५९ पैकी ४१ जागा निवडून आणण्यामध्ये ऐतिहासिक यश मिळाले.
 
चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वसामान्यांसाठी झटत आदरणीय अजितदादांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार केला. या कार्यात दादांना सावलीसारखी साथ देणार्‍या सुनेत्रावहिनींनाच दादांचा उत्तराधिकारी होण्याचा मान आणि अधिकार असल्याची भावना व्यक्त केली. महाराष्ट्राच्या इतिहासात अजितदादांचे कर्तृत्व तर लिहिले जाईलच; पण त्याचबरोबर दादांच्या दुर्दैवी अकाली निधनानंतर, धीरोदात्तपणे राष्ट्रवादी परिवारासाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी स्वत:ला या कठीण प्रसंगातून सावरत कणखरपणे उभ्या राहणार्‍या सुनेत्र पवार यांची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद राहील, असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला.