सुरक्षा पर्यवेक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडले , सुरक्षारक्षकांकडून दरमहा १०० रुपयांची मागणी

नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा रचून कारवाई

By Raigad Times    28-Feb-2026
Total Views |
 new mumbai
 
नवी मुंबई | नवी मुंबई येथे सुरक्षारक्षकांकडून दरमहा लाच मागणार्‍या सुरक्षा पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. १ हजार ९०० रुपयांची लाच स्वीकारताना सुरक्षा पर्यवेक्षकाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
एमएसईडीसीएल, कोपरखैरणे येथे कार्यरत असलेले सुरक्षा पर्यवेक्षक निलेश तुकाराम बढे (वय ४६) हे सुरक्षा रक्षकांना ड्युटी लावणे, पॉइंट तपासणी करणे व हजेरी नोंदविणे ही कामे पाहतात. त्यांनी काम सुरळीत ठेवण्यासाठी तक्रारदाराकडे दरमहा १०० रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
 
तक्रारदार व त्यांच्या दोन सहकार्‍यांकडील एकूण १,९०० रुपये बाकी असल्याचे सांगून, रक्कम न दिल्यास गैरसोयीच्या ठिकाणी बदली करणे अथवा कामावरून कमी करून प्रतीक्षा यादीत टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याबबात तक्रारदाराने तक्रार दाखल केली. २७ फेब्रुवारी रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता निलेश बढे याने १ हजार ९०० रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
 
त्यानुसार त्याच दिवशी सापळा रचण्यात आला एमएसईबी कॉलनी, सिक्युरिटी चौकीजवळ, सेक्टर १५, वाशी येथे दुपारी १.०५ वाजता तक्रारदाराकडून १ हजार ९०० रुपये स्वीकारताना निलेश बढे यांना रंगेहात पकडण्यात आले. कारवाईनंतर त्यांची अंगझडती घेण्यात आली असून त्यांचा मोबाईल तपासासाठी जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली.
 
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभाग, नवी मुंबई यांच्या पथकाने पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या कारवाईवर ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे व सुहास शिंदे तसेच पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांचे पर्यवेक्षण होते.