नवी मुंबई | विवाह जुळवणार्या विविध मॅट्रीमोनियल संकेतस्थळांवर तब्बल १२ बनावट नावांनी नोंदणी करून १० पेक्षा अधिक महिलांची आर्थिक व शारिरीक शोषण करणार्या दोनजणांना नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल ८९ लाख ४० हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे.
आदर्श प्रशांत म्हात्रे (वय ३४, रा. अलिबाग) आणि प्रेम किरण म्हात्रे (वय २९, रा. कळंबोली, पनवेल, रायगड) अशी या दोघांची नावे आहेत. हे भामटे विवाहाच्या निमित्ताने महिलांशी संपर्क साधत. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर भविष्यात एकत्र राहण्याचे, घर किंवा फ्लॅट घेण्याचे स्वप्न रंगवत. पूर्ण विश्वासात घेतल्यानंतर हे या महिलांना त्यांच्या नावावर लोन काढण्यास प्रवृत्त करत आणि कर्जाची रक्कम वतःच्या खात्यात वळवून महिलांची फसवणूक करत असत.
काही प्रकरणांत शारीरिक शोषणाचाही प्रकार समोर आले आहेत. आदर्श म्हात्रे आणि प्रेम म्हात्रे या दोघांना कॅसिनोच्या शौक होता. तसेच ऐश-आरामाच्या जीवनशैलीसाठी या दोघांनी हा मार्ग अवलंबल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि आर्थिक व्यवहारांच्या आधारे भामट्यांचा माग काढत त्यांना अटक केली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांत १५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू असून विवाह संकेतस्थळांवर ओळख करून घेताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.