पेण | बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारपासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. "कोरा झालेला सातबारा मूळ मालकांच्या नावे परत मिळावा” या प्रमुख मागणीसाठी शेतकर्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.
शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता उपविभागीय (प्रांत) कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्त शेतकरी एकत्र जमले. घोषणाबाजी करत त्यांनी बेमुदत उपोषण सुरू करून शासनाचे लक्ष वेधले. उपोषणस्थळी हर्षवर्धन सपकाळ (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी), शेकापचे महाराष्ट्र राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, पेण तालुका अध्यक्ष अशोक मोकल, महासचिव (संघटक काँग्रेस) नंदा म्हात्रे, श्रुती म्हात्रे तसेच महिला जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस राणी अग्रवाल यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दर्शविला.
यावेळी सपकाळ यांनी प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीचे कौतुक करत त्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेस पक्ष ठामपणे पाठीशी उभा राहील, असे आश्वासन दिले. विधानसभा व संसदेत भूमी अधिग्रहण कायद्याच्या चौकटीतून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. बाळगंगा प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या जमिनीला १६ वर्षे पूर्ण होत असून अनेक जमिनींचे सातबारा उतारे कोरे झाले आहेत. त्यामुळे संबंधित जमीन पुन्हा शेतकर्यांच्या नावे करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.