‘स्मार्ट अंगणवाडी’ योजनेत महाराष्ट्र देशात अग्रणी , राज्यात २४ हजार ७०० हून अधिक स्मार्ट किटचे वितरण

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे

By Raigad Times    27-Feb-2026
Total Views |
mumbai
 
मुंबई | ‘स्मार्ट अंगणवाडी’ ही अभिनव योजना राज्यात राबविण्यात येत असून या योजनेमध्ये महाराष्ट्र देशात अग्रणी ठरला आहे. आतापर्यंत राज्यातील २४ हजार ७०० हून अधिक अंगणवाड्यांना स्मार्ट किटचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
 
याबाबत सदस्य उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, अमोल मिटकरी, ज. मो. अभ्यंकर यांनी उपप्रश्न उपस्थित केले. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, राज्यात आतापर्यंत २४ हजार ७०० हून अधिक अंगणवाड्यांना स्मार्ट किट देण्यात आले असून राज्यात एकूण १.१० लाखांपेक्षा जास्त अंगणवाड्या आहेत. दरवर्षी ५ हजार अंगणवाड्यांना स्मार्ट किट देण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले असून त्यासाठी सुमारे ९० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो.
 
स्मार्ट किट देताना संबंधित अंगणवाडीची इमारत ही शासनाच्या स्वमालकीची असणे बंधनकारक आहे. स्मार्ट किटसाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाते. मात्र प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश दरवर्षी दिले जातात. शासनाच्या आर्थिक नियमांनुसार ही प्रक्रिया पार पाडली जाते, असे त्यांनी सांगितले. नवीन अंगणवाड्यांसाठी जिल्हा नियोजनच्या ३ टक्के राखीव निधीतून प्राधान्याने तरतूद केली जाईल. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.