महाड एमआयडीसीत एम्बायो कंपनीत आग

By Raigad Times    27-Feb-2026
Total Views |
 mahad
 
महाड | महाड औद्योगिक क्षेत्रातील एम्बायो लि. या कंपनीत गुरुवारी (२६ फेब्रुवारी) दुपारी रासायनिक प्रक्रीयेचे काम सुरु असताना आग लागली. मात्र तातडीने या आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला आहे. एका महिन्यात या कंपनीत लागलेली ही दुसरी आग असल्याने आजुबाजूस असणार्‍या गावातील ग्रामस्थ कंपनी गेटच्या बाहेर जमा झाले होते.
 
मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. महाड एमआयडीसी तील एम्बायो लि. या कंपनीत गुरुवारी दुपारी अडिच वाजण्याच्या सुमारास एका छोट्या प्लॅन्टमध्ये रासायनिक प्रक्रीयेचे काम सुरु असताना अचानक प्रेशर निर्माण होऊन आग लागली. मात्र तातडीने महाड एमआयडीसीतील अग्नीशमन दलाला पाचारण केल्याने अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
 
एका महिन्यात सलग दुसर्‍यांदा कंपनीत आग लागल्याने आजुबाजूस असलेल्या गावातील ग्रामस्थ भयभीत होऊन कंपनी गेटच्या समोर मोठ्या संख्येने जमा झाले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र महाड एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली. या आगीत कोणतीही जिवीतहानी अथवा दुखापत झाली नसल्याची माहिती कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.