झेडपी अध्यक्ष निवडीचा मुहूर्त ठरला! अध्यक्ष, सभापतींची २० मार्चपूर्वी निवड करा

ग्रामविकास विभागाचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश

By Raigad Times    26-Feb-2026
Total Views |
mumbai
 
मुंबई | जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. २० मार्चपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाची निवड करून बैठक घ्या, असे आदेश ग्रामविकास विभागाने काढले आहेत. जिल्हाधिकार्‍यांना यासंबंधीचे पत्र देण्यात आलेले आहे.
 
त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांना लवकरच निवडीचा कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे. रायगड जिल्हा परिषदेत तर अवघ्या ४ दिवसांत अध्यक्ष बसणार, अशी चर्चा असून राष्ट्रवादी आणि भाजप सदस्यांची गोव्याला गेलेली टूर परतीचा प्रवास सुरु करणार आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणार्‍या १२५ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक पार पडली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती यांची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या बैठका घेणे आवश्यक आहे.
 
निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून सुरु होतो. जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांची पहिली बैठक २० मार्च, २०२६ पूर्वी आयोजित करावी असे ग्रामविकास विभागाने संबंधीत जिल्हाधिकार्‍यांना पत्राव्दारे कळविले आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांना २० मार्चपूर्वी जि.प अध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती निवडीसाठी बैठक बोलवणे क्रमप्राप्त आहे. रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी १६ आणि भाजप १५ असा सत्ता स्थापनेचा निर्णय पक्का झालेला आहे.
 
या दोन्ही पक्षांचे सदस्य निवडून आल्यापासून गोव्यात मनोमिलनासाठी गेले आहेत. १५ दिवस उलटल्यानंतर अनेक सदस्यांना आता घरची ओढ लागली आहे. बुधवारी (२५ फेबु्रवारी) अध्यक्ष निवडीची अंतिम तारीख दिल्यामुळे हे सर्व सदस्य परतीच्या मार्गाला लागणार आहेत. जिल्ह्यात आल्यानंतरही त्यांना फार प्रतीक्षा करावी लागेल असे वाटत नाही. त्यामुळे दोन चार दिवसांतच जिल्हा परिषदेचा नवा अध्यक्ष रायगडकरांना मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत सर्वाधिक २१ जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाल्या आहेत.
 
मात्र राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आल्याने शिवसेनेवर विरोधात बसण्याची वेळ अशी चर्चा आहे. सत्तेत सहभागी होण्यासाठी पक्षाचे नेते प्रयत्नशील आहेत. दगाफटका नको म्हणूनच राष्ट्रवादी आणि भाजपने त्यांच्या सदस्यांना गोव्यात नेऊन ठेवले आहे. परत आल्यानंतरही ते थेट जिल्हाधिकार्‍यांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि अध्यक्ष निवडीनंतरच घरी जातील, असे दिसत आहे. एकंदरीत रायगड जिल्हा परिषदेचा नवा अध्यक्ष कोण होणार? याचे उत्तर रायगडकरांना मिळणार आहे.