मुंबई | राज्यात वाढत चाललेल्या मुलांच्या डिजिटल व्यसनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने तज्ज्ञांची टास्क फोर्स स्थापन केली असून पुढील अधिवेशनाच्या आत सविस्तर अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे आणि संजय केणेकर यांनी लक्षवेधीद्वारे हा विषय उपस्थित केला होता. चर्चेत प्रविण दरेकर, राज्यात १८ वर्षांखालील सुमारे चार कोटी मुले असून त्यापैकी जवळपास तीन कोटी मुले ही १५ वर्षांखालील आहेत. त्यामुळे डिजिटल व्यसन हा केवळ वैयक्तिक नव्हे तर सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. गेमिंग अॅप्स, सोशल मीडिया वापरावर वयोमर्यादा, अल्पवयीनांसाठी जाहिरातींवर निर्बंध यांसारख्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
राज्य सरकारकडून २ फेब्रुवारी रोजी प्रधान सचिव विरेंद्र सिंह यांना लेखी आदेश देऊन तज्ज्ञ कार्यदल स्थापन करण्याचे निर्दे श देण्यात आले. या टास्क फोर्समध्ये शिक्षणतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, तंत्रज्ञान तज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, डॉक्टर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी असतील. मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले की, कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. मात्र राज्याच्या टास्क फोर्सच्या शिफारसी केंद्राला पाठवण्यात येतील.